
अपरिपक्व म्हणून आजोबांनी जाहीर फटकारले असले तरी, राष्ट्रवादीत पार्थ यांच्या शब्दाला मोठी किंमत
पुणे ः लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधून पराजय स्वीकारल्यानंतर पार्थ पवार राजकीय मैदानापासून लांब होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांनी पार्थ पवार राजकीय मैदानात सक्रीय झाल्याचे दिसून आले. त्यातच आजोबा शरद पवार यांच्याविरोधी भूमिका घेतल्याने पार्थ अधिक चर्चेत आलेत.
राम मंदिर निर्माणासाठी शुभेच्छा पत्र असो वा सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी पार्थ यांनी आजोबा शरद पवार यांच्याविरोधी भूमिका घेतल्याचे दिसले. यासाठी शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीरपणे अपरिपक्व संबोधल्याने पवार कुटुंबातील वादावर पुन्हा चर्चा रंगली होती आणि नेहमीप्रमाणे पावर कुटुंबातील कलहावर पवारांनीच पडदा टाकला.
त्यानंतर मात्र पार्थ पवार राजकीय मैदानात चांगलेच गाजत आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रवादीत पार्थ पवार यांना माणनारा मोठा गटदेखील आहे हे सोशल मीडियावरून दिसून येते. तसेच, पार्थ यांना आजोबांनी जदाहीरपणे फटकारले असले तरी राष्ट्रवादीत पार्थ यांच्या शब्दाला किंमत असल्याचेही दिसून येते. याचे ताजडे उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेता कोण असावा यासाठी पार्थ यांनी राजू मिसाळ यांच्या नावाची शिफारस केली होती असे सांगण्यात येत आहे आणि पार्थ यांचा शब्द जपत राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पादासाठी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, महापालिकेत आता विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे हा प्रश्न राष्ट्रवादीपूढे होता. मात्र, पार्थ पवारांच्या शिफारशी नंतर राजू मिसाळ यांच्या नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित झाले आहे.
असे सांगण्यात येते की, पिंपरी- चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भोसरीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, भोसरीत प्रतिस्पर्ध्याला ताकद मिळू नये म्हणून भाजप आमदार महेश लांडगे यांची मैत्री राजू मिसाळ यांच्या पथ्यावर पडली असून पार्थ पवार यांनीही राजू मिसाळ य़ांच्या नावाची शिफारस केल्याने मिसाळ हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते असतील हे निश्चित झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची (BJP) सत्ता असून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या नगरसेवकांना विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रत्येकी एक वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेत तीन विरोधी पक्षनेते झाले आहेत.
तिसरे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा कार्यकाळ 1 ऑगस्ट रोजी संपला. कोरोना संकटामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, असे काटे समर्थकांनी पक्षश्रेष्ठींना सुचविले होते. मात्र तसे होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे नाना काटे यांनी राजीनामा दिला. तीन वर्षात योगेश बहल, दत्ता साने व नाना काटे यांना संधी मिळाली. त्यानंतर या वेळेस अजित गव्हाणे, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर ही नावे चर्चेत होती. त्यामध्ये भोसरीत राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद वाढवण्यासाठी व आमदार महेश लांडगे यांना शह देण्यासाठी गव्हाणे यांना संधी मिळण्याची जोरदार शक्यता होती. मात्र पडद्यामागील काही राजकीय घडामोडींनी राजू मिसाळ यांचे नाव उचलून धरण्यात आले. तसेच त्यांचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याशी असलेली मैत्री व पार्थ पवार यांनी केलेली शिफारस विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत कामी आली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे .