
यवतमाळ : स्थानिक पुष्पकूंज सोसायटी परिसरात एका घराला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर लगतच्या दोन घरांनाही आपल्या कचाट्यात घेतले. आगीत तीन सिलिंडरचे स्फोट झाले. यात दोन जण किरकोळ जखमी झाले असून तीन घरे, गादी कारखाना तसेच अॅक्वा कँन असे जवळपास वीस लाखांचे नुकसान झाले. ही घटना शनिवार दुपारी बारा वाजताच्या सूमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, वडगाव परिसरात अजय गुजरे यांचे घर आहे. त्यांच्या घरातच गादी कारखान्याला जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका घराला सुरुवातीला आग लागली. काही कळाण्याआधी आता याठिकाणी सिलिंडरचा पहिला स्फोट झाला. त्यानंतर लगतच्या घरापर्यंत आग पोहोचली. याठिकाणीही सिलिंडरचा स्फोट झाला. पालिकेची अग्नीशमन यंत्रणा येईपर्यंत आग गुजरे यांच्या घरापर्यंत पोहोचली. या आगीत गादी कारखाना तसेच गुजरे यांचे घर व लगतच्या अन्य दोन घर जळून खाक झाले. नुकसानीचा आकडा वीस लाखांच्या वर आहे. सिलिंडरच्या स्फोटात अजय गुजरे तसेच शुभम गुजरे किरकोळ जखमी झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब लागले. काहीच्या मते शॉर्ट सर्क्रीटने आग लागल्याचा अंदाज आहे. तर काहीच्या मते सिलिंडर पाइप लिंक झाल्याचे म्हणणे आहे.