बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने प्रशासनाला माहिती दयावी : ना. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यात इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमधील 9 नागरिक पॉझिटीव्ह

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकूण 12

चंद्रपूर :  जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपर्यंत 3 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात आणखी 9 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन) करण्यात आले होते. त्यामुळे बिनबा गेट व दुर्गापूर हे प्रतिबंधीत क्षेत्र वगळता अन्य कोणताही भाग सिल करण्यात आला नाही. जिल्ह्यात 21 मे रोजी दुपारपर्यंत रुग्णांची संख्या एकूण 12 झाली आहे. या परिस्थितीत नागरिकांनी स्वयंप्रेरणेने जिल्हा प्रशासनाला आपल्या आरोग्याबाबत माहिती करून द्यावी. तसेच इन्स्टिट्यूशनल किंवा होम कॉरेन्टाइन सूचनेप्रमाणे रहावे, असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर येथे राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगसाठी आल्यानंतर तात्काळ राज्याचे मदत व पुनर्वसन ,आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह वैद्यकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. ते काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन केले आहे.

चंद्रपूर शहरात बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिकांनी शकुंतला लॉन्स येथे आपल्या नावाची नोंदणी करावी व प्राथमिक आरोग्य तपासणी करावी, असे देखील त्यांनी सांगितले. याशिवाय अन्य तालुक्याच्या ठिकाणी थेट पोहोचणाऱ्या नागरिकांनी बस स्थानक परिसर व तहसील कार्यालयामध्ये नावाची नोंद करावी. गावांमध्ये थेट पोहोचणाऱ्यांनी गावातील यंत्रणेला, आशा वर्करला याबाबत माहिती द्यावी, योग्य उपचाराने कोरोना आजार हा बरा होतो. त्यासाठी वैद्यकीय उपचार कक्षात राहणे आवश्यक आहे. याची नोंद ठेवून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यसाठी पुढे येण्याचे आवाहन देखील पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसर व चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी 2 मे रोजी कृष्णनगर तर 13 मे रोजी बिनबा गेट या परिसरात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. या दोन्ही रुग्णाच्या संपर्कातील सर्व नागरिक निगेटिव्ह आढळले होते. काल 20 मे रोजी जिल्ह्यातील तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण 55 वर्षीय नागरिक दुर्गापूर परिसरात आढळला होता. त्यानंतर हा परिसर देखील सील करण्यात आला आहे.

हे सर्व बाहेरून आलेले रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) आहेत. या सर्वांचे 19 मे रोजी स्वॅब घेण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत यांनी सुद्धा या ठिकाणच्या वैद्यकीय व्यवस्थेबद्दल आश्वस्त असावे. जिल्हा प्रशासन तातडीने बरे होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये, असे देखील पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवार दिनांक 21 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 झाली आहे. 20 मे पर्यंत 3 व 21 मे रोजी 9 असे एकूण 12 रुग्ण झाले आहे. रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे 9 रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यापैकी 5 जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर 4 जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
वन अकादमीमध्ये 19 मे रोजी संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले 4 नागरिक नाशिक मालेगाव एमआयडीसीमध्ये काम करीत होते. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने हे 4 नागरिक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वन अकादमी मध्ये ठेवण्यात आले होते. हे 4 नागरिक चिरोली ( मूल ), जाम (पोंभुर्णा ),विसापूर ( बल्लारपूर ),विरवा ( सिंदेवाही ) परिसरातील आहे.

पुणे येथून आलेले 38 वर्षीय पती व 33 वर्षीय पत्नी वरोरा येथे यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणात होते. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी परिसरातील 21 वर्षीय मुलगी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. ही देखील पुण्यावरुन आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आरवट येथील 21 वर्षाचा युवक ठाण्यावरून परत आला. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील 21 वर्षीय युवक दिल्लीवरून परत आला आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती अतिशय उत्तम आहे, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे, अशी माहितीही शेवटी त्यांनी दिली..

Previous post कापसाची होळी करून शेतकऱ्यांनी केला निषेध
Next post जेव्हा ठाणेदाराला साहेब खर्रा हवा काय ? अशी विचारणा होते तेव्हा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News