कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 12 मिनिटांपर्यंत वाढवण्यासाठी सल्लामसलत

कम्युनिटी रेडिओवरील बातम्यांचा प्रस्ताव विचाराधीन; कम्युनिटी रेडिओची संख्या लवकरच वाढवण्याची योजना: जावडेकर

नवी दिल्ली-  कम्युनिटी रेडिओला दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बरोबरीचा दर्जा देण्यासाठी कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले. सर्व कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या श्रोत्यांशी त्यांनी एकाच वेळी संवाद साधला, त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी 7 आणि 7.30 वाजता दोन समान टप्प्यात याचे प्रसारण झाले.

जावडेकर म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करताना 75% खर्च मंत्रालयाकडून केला जातो जो एकूण खर्चाचा मोठा हिस्सा असतो परंतु दैनंदिन कामकाजाचा खर्च केंद्राद्वारे उचलला जातो. सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास उत्सुक आहोत जेणेकरुन त्यांना निधी मिळण्याची गरज भासू नये आणि कम्युनिटी केंद्रांवरून अधिकाधिक स्थानिक जाहिराती प्रसिद्ध होतील.

कम्युनिटी रेडिओ हा मुळातच एक समुदाय आहे असे आपल्या संवादाच्या प्रारंभी मंत्री म्हणाले. ही केंद्रे म्हणजे परिवर्तनाचे पाईक आहेत आणि ही केंद्रे दररोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात आणि लवकरच अशा केंद्रांची संख्या वाढविण्याची योजना घेऊन मंत्रालय पुढे येईल असे त्यांनी सांगितले.

लोकांना कोरोना विषाणू विरूद्धचा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन करतानाच मंत्री म्हणाले की आपण जशी इतर आजारांवर मात केली तशीच यावरही करू. तथापि, त्यांनी हे स्पष्ट केले की आता आपल्याला नवीन जीवनशैलीचा अंगीकार करावा लागेल ज्यात शक्यतो घरी राहणे,  वारंवार हात धुणे, चेहऱ्यावर मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर नियमांचे पालन करणे या चार गोष्टी अंतर्भूत असतील.

सुरक्षित अंतर आणि आर्थिक घडामोडींविषयीच्या आव्हानांवरील पेचप्रसंगावर बोलताना “जान भी जहां भी” या मंत्राचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि सांगितले की प्रतिबंधात्मक क्षेत्रात निर्बंध सुरू असतानाच ग्रीन झोनमध्ये आर्थिक क्रिया सुरू केल्या आहेत.

बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या मुख्य मागणीवर मंत्र्यांनी भाष्य केले. एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले. बनावट बातम्यांचा धोका ओळखून त्या प्रसारित करण्यापूर्वी स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून त्या बातम्यांची सत्यासत्यता पडताळून मोलाची भूमिका बजावावी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. त्या बातम्या आकाशवाणीलाही पाठवाव्या जेणेकरून सत्य पडताळणीला अधिक बळ मिळेल असा सल्लाही त्यांनी दिला.  ते म्हणाले की, मंत्रालयाने पत्र सूचना कार्यालयांतर्गत एक सत्यता पडताळणी विभाग अर्थात फॅक्ट चेक सेल तयार केला आहे आणि कम्युनिटी रेडिओ फॅक्ट चेक सेलच्या भूमिकेस पूरक ठरू शकतात.

केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की हे एक सर्वसमावेशक पॅकेज आहे ज्यात शेती आणि उद्योगासह विविध क्षेत्रातील सुधारणांचा समावेश आहे आणि आयात कमी करून निर्यातीत वाढ करण्याचा या पॅकेजचा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले की, हे पॅकेज चांगले असून लोक त्याबद्दल आनंदी आहेत.

Previous post निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांच्या हत्येने धक्का
Next post आमदार किशोर जोरगेवारांचा पहिला निधी पाण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published.

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News