२५ लक्ष निधीतून १३ बोरवेलच्या कामांना सुरुवात, आठ दिवसात काम होणार पुर्ण
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाई पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला पहिला आमदार निधी चंद्रपूकरांची तहान भागविण्याठी खर्च केला असून आमदार स्थानिक विकास निधीतून चंद्रपूर शहरात १३ बोरवेलच्या कामांना सुरुवात झाली आहे. हे सर्व कामे प्रगतीपथावर असून येत्या आठ दिवसात या सर्व बोरवेल नागरिकांची तहान भागविण्यासाठी सज्ज होणार आहे.
निवडणूकी दरम्याण पिण्याच्या पाण्याचा विषय चांगलाच गाजला होता. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. आता निवडून येताच त्यांनी आपला पहिलाच निधी पाण्यासाठी खर्च करत नागरिकांना थोड्या प्रमाणात का होई ना दिलासा दिला आहे. दर उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना मानव निर्मित पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा ही हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. अशात आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जलसेवा रथच्या माध्यमातून शहरात पाणी पूरवठा केल्या जात आहे. मात्र यावर न थांबता आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या पहिल्या आमदार विकास निधीतील मोठा टप्पा शहरातील बोरवेलसाठी खर्च केला आहे.
आमदार निधीतील २५ लक्ष रुपयांनी शहरातील विविध १३ ठिकाणी बोलवेलच्या कामांना सुरुवात झाली आहे. यात अष्टभुजा वार्ड २, महाकाली प्रभाग २, बालाजी प्रभाग २, इंन्डेस्ट्रीयल इस्टेड २, बिनबा प्रभाग १, गंजवार्ड १, गायत्री शक्ती पीठ, दाताळा १, बाबूपेठ आम्रपाली विहार १, बागला चौक १ असे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात या बोरवेलच्या कामांना सुरुवात झाली आहे. आठ दिवसात या बोरवेलचे काम पूर्ण होणार असल्यामूळे नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.