शेतकऱ्यांनी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) तंत्राचा अवलंब करावा : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

चंद्रपूर : बीबीएफ तंत्राचा पेरणीसाठी अवलंब केल्यास जास्त पाऊस, पावसाचा खंड या दोन्ही परिस्थितीत पिकाची वाढ चांगली होते. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

सोयाबीन पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास उडीद ,मूग, कापूस, ज्वारी आदी आंतरपिके शेतकरी त्याच्या शेतात घेऊ शकतो आंतरपीक घेतल्याने अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यास मिळण्यास मदत होते.

बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पिकाला जलसंधारण होण्यास मदत मिळते तसेच सरीत पडलेल्या पावसाचे पाणी चांगले मुरते. अधिक पाऊस पडला तर सरीव्दारे पाण्याचा निचरा होतो. पावसाच्या खंड काळात पीक पाण्याचा ताण सहन करते व पिकाची चांगली व जोमदार वाढ होण्यास मदत मिळते.

या तंत्रज्ञानामुळे पेरणी केल्यास एकरी 16 किलो बियाणे पेरणीसाठी लागत असते. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 25 ते 30 किलो बियाणे कमी लागते. त्यामुळे एकरी खर्च कमी येत असतो. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे 65 ते 75 किलो/ प्रति हेक्‍टर बियाणे जमिनीची पोत आणि वाणनुसार आवश्यक असते.

जास्त पाऊस झाला अथवा सतत पाऊस झाल्यामुळे वा शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांची वाढ खुंटते त्यामुळे उत्पादनात घट येते. परंतु बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी केल्यास सरी द्वारे पाण्याचा निचरा होतो तसेच पिकांमध्ये ठरावीक अंतर असल्याने सरीमध्ये हवा खेळती राहून उत्पादन चांगले येण्यास मदत होते.

बीबीएफ तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सोयाबीन पिकाच्या उत्पादनाचा खर्च निम्म्यावर येतो तर आणि उत्पन्नात 2 ते 3 क्विंटल पर्यंत वाढ होण्यास मदत होते. जास्त पाऊस अथवा कमी पाऊस झाल्यास या तंत्रज्ञानामुळे शेतकरी पिकाचे नुकसान टाळू शकतो व चांगले पीक घेऊ शकतो. रुंद वरंबा सरी मुळे झाडाच्या मुळाला हवा खेळती राहत असल्याने तथा झाडाची संख्या कमी राहत असल्याने झाडांची वाढ चांगली होऊन पीक जोमदार येण्यास मदत होते.

अधिका अधिक शेतकऱ्यांनी या कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल व तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून चित्रफितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे.

Previous post गोंडपिपरीच्या कोडापे-कांबळे-कटरे “त्रिदेव” शिपायांच्या हैरत अंग्रेज कारनामा!
Next post चंद्रपूर जिल्ह्यात 71 नमुने प्रतीक्षेत ; 12 पॉझिटिव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News