
चंद्रपूर :जिल्हा नियोजन भवन येथे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले.
याप्रसंगी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. हा कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर सोशल डिस्टन्सिंग पाळत संपन्न झाले.
दहशतवाद व हिंसाचार या समस्या सुटण्यासाठी देशामध्ये 21 मे रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला जातो. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या दिवशी सर्व सरकारी कार्यालय येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात येते. या दिवसाच्या निमित्ताने प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम घेण्यात येते.
तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन या दिवसाच्या निमित्ताने दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, तहसीलदार संजय राईंचवार, तहसीलदार यशवंत धाईत तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.