
◆ बाहेरून आलेले दोन हजारावर
◆ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
चंद्रपूर : जिल्ह्यात 2 मे रोजी एक रुग्ण, 13 मे रोजी एक रुग्ण, 20 मे रोजी 10 रुग्ण तर आज शनिवारी तीन रुग्ण असे एकूण 15पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. यापैकी 12 रुग्ण हे बाहेरून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही माहिती न लपविता आपल्या स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या प्रकृतीची काळजी घेत उपचारासाठी पुढे यावे प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
15 पैकी 14 पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून 1 पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या 14 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कोरोना आजारासाठी आवश्यक असणारी सर्व सुविधा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. तथापि ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांनी तसेच ज्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत . त्यांनी अन्य कोणालाही आपल्यापासून प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.
जिल्ह्यात शनिवारी सकाळी मुंबई येथून आलेली बाबुपेठ परिसरातील एक युवती पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले ही युवतीने एका खाजगी दवाखान्यामध्ये मुंबई येथे काम करीत होती बावीस दिवस ती एका हॉटेलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात होती. 16 मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली तेव्हापासून होम कॉरेन्टाईन होती. लक्षणे जाणवायला लागल्या वर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी युवतीचा नमुना घेण्यात आला काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
शनिवारी दुपारी बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोहोचला होता. या व्यक्तीला आला त्या दिवसांपासून संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे नमुने घेण्यात आले. आज 23 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर शनिवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा गावातील एक 16 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. विरव्हा येथील यापूर्वीच नाशिक मालेगाव येथे काम करणाऱ्या एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाच्या कमी जोखमीच्या संपर्कातील ही 16 वर्षीय मुलगी असून तिला देखील चंद्रपूर येथे संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींचे कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण भागात व शहरी भागात एकूण 7 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले असून कंटेनमेंट झोन मधील सर्व कुटुंबातील लोकसंख्येची दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी आणण्यात येत आहे.
कंटेनमेंट झोन क्र.1 बिनबा गेट येथे एकूण 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. कंटेनमेंट झोन क्र.2 दुर्गापुर मधील वार्ड क्र. 3 येथे एकूण 5 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.3 विसापूर बल्लारपूर येथे एकूण 11 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.4 जाम तुकुम पोंभुर्णा येथे एकूण 5 आरोग्य पथकामार्फत 310 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.5 चिरोली मुल येथे 22 आरोग्य पथकामार्फत 1 हजार 97 घरांचे सर्वेक्षण झाले. कंटेनमेंट झोन क्र.6 विरव्हा सिंदेवाही येथे 3 आरोग्य पथकांमार्फत 173 घरांचे सर्वेक्षण झाले.कंटेनमेंट झोन क्र.7 लक्कडकोट राजुरा येथे 10 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 721 आहे. यापैकी 15 नागरिक पॉझिटिव्ह असून 632 नागरिक निगेटिव्ह आहे. 74 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 68 हजार 455 आहे. गृह अलगीकरण पूर्ण झालेले 54 हजार 396 नागरिक आहेत. तर 14 हजार 59 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 207 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 1 हजार 884 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 323 नागरिकांची संस्थात्मक अलगीकरणात आहे.