बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन बंधनकारक
Ø कॉरेन्टाइन रुग्ण बाहेर फिरतांना दिसल्यास डायल 1077
Ø सर्व धार्मिक कार्यक्रम समाज हितासाठी घरातच करा
चंद्रपूर,दि. 24 मे: जिल्ह्यात 2 मे रोजी एक रुग्ण, 13 मे रोजी एक रुग्ण, 20 मे रोजी 10 रुग्ण, 23 मे रोजी 7 रुग्ण, तर आज रविवारी 2 रुग्ण असे एकूण 21 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. 24 मे रोजी रविवारी सायंकाळी आरोग्य विभागाने आणखी 2 रुग्णांची पुष्टी केल्यामुळे जिल्ह्यात आता 21 रुग्ण झाले आहेत.
या परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, शारीरिक अंतर ठेवावे. मास्कचा वापर करावा आणि कोणताही होम कॉरेन्टाइन रुग्ण रस्त्यावर फिरत दिसल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
बाहेरील राज्यातून तसेच जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन मध्ये राहणे बंधनकारक आहे, असा रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल,असे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे. समाज हितासाठी अन्य सर्व धार्मिक उत्सावाप्रमाणे आगामी ईद हा सण देखील घरातच साजरा करावा. 31 पर्यंत लॉकडाऊन कायम असून रात्री 7 ते सकाळी 7 संचारबंदी सुरूच असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
रविवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवकांचा समावेश आहे. हा युवक 11 मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम कॉरेन्टाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. 22 मे रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.
दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे. ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. 22 तारखेला या 45 वर्षीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते.
हे दोन नवीन रुग्ण आज 24 मे रोजी पॉझिटिव्ह ठरल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे.
यापूर्वी 21 पैकी 20 ऍक्टिव्ह रुग्ण असून 1 पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 20 रुग्णांपैकी 8 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. तर 12 रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यात कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे व कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे व आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
संशयित रुग्णांचे आवश्यकतेनुसार कोविड-19 तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात 6 व महानगरपालिका क्षेत्रात 2 असे एकूण 8 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले असून उर्वरित भागात कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
कंटेनमेंट झोन क्र.1 बिनबा गेट येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 9 असून सर्वच 9 नमुने निगेटिव्ह आहेत.तसेच, 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.2 दुर्गापुर मधील वार्ड क्र. 3 येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 6 असून 5 नमुने निगेटिव्ह आहे.तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे.तर, 5 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.3 विसापूर बल्लारपूर येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 6 असून सर्वच 6 नमुने प्रतीक्षेत आहेत.तसेच,11 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.4 जाम तुकुम पोंभुर्णा येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 3 असून सर्वच 3 नमुने प्रतीक्षेत आहेत. तसेच, 5 आरोग्य पथकामार्फत 310 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.5 चिरोली मुल येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 2 असून 1 पॉझिटिव्ह तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे. तसेच,22 आरोग्य पथकामार्फत 1 हजार 97 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.6 विरव्हा सिंदेवाही येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 13 असून 4 पॉझिटिव्ह तर 9 नमुना प्रतीक्षेत आहे.तसेच, 3 आरोग्य पथकांमार्फत 173 घरांचे सर्वेक्षण झाले.
कंटेनमेंट झोन क्र.7 लक्कडकोट राजुरा येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 2 असून 1 पॉझिटिव्ह तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे. तसेच, 10 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.8 बाबुपेठ चंद्रपूर येथील अति जोखमीच्या संपर्कातील 4 तर कमी जोखमीच्या संपर्कातील 22 व्यक्तींचा शोध घेतलेला आहे. तसेच, 3 आरोग्य पथकामार्फत 131 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 769 आहे. यापैकी 21 व्यक्ती पॉझिटिव्ह असून 641 निगेटिव्ह आहे. तर, 107 व्यक्तींचा नमुना अहवाल प्रतीक्षेत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 317 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 1 हजार 955 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 362 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 55 हजार 272 व्यक्ती आहेत. तर 13 हजार 864 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.