….असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही,

उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणाव असल्याचं चित्र आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दोन उमेदवारांवर अडून बसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. असंच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब थोरात यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. मात्र कॉंग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत धूसफूस असल्याचं समोर आलं.मुख्यमंत्र्यांच्या पवित्र्यानंतर काँग्रेस नेते आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन याविषयी चर्चा केली.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सहा उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे दोन आहेत. माझ्यावर कोणताही दबाव नाही, सहा उमेदवार निवडून कसे येतील, याचे नियोजन सुरु असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली होती.

काँग्रेसची आग्रही भूमिका
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेत पुढचं पाऊल टाकलं. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवारही जाहीर केला. विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे ५ तर भाजपचे ४ उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्यानुसार आता शिवसेना २, राष्ट्रवादी २ आणि काँग्रेसही २ जागा लढणार आहेत.
दुसरीकडे भाजपने संख्याबळानुसार ४ जागांवर दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीने सहावा उमेदवार दिल्याने, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधानपरिषदेत भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३ , काँग्रेस २ आणि शिवसेनेचे १ सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केल आहेत. उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता काँग्रेसनेही उमेदवार जाहीर करुन, राष्ट्रवादीच्या पुढे पाऊल टाकलं आहे. राष्ट्रवादीने अद्याप अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केलेले नाहीत

कुणाचं संख्याबळ काय?
सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३, काँग्रेसच्या २ आणि शिवसेनेची १ अशा एकूण ९ जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या ५ आणि भाजपच्या ३ जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे १०५, शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, काँग्रेसचे ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पार्टी २, एमआयएम २, प्रहार जनशक्ती २, मनसे १, माकप १, शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य पक्ष १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष १३ आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी २९ मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

Previous post मान्सून मुंबईत ११ जूनला होणार दाखल ; स्कायमेटची माहिती
Next post अखेर ठरलं! विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News