कृषिविषयक अभ्यासक्रमांच्याही फक्त अंतिम वर्षाच्याच परीक्षा : कृषिमंत्री दादा भुसे

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील परीक्षांच्या नियोजनाचा कृषी अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी येथे जाहीर केला. त्यानुसार जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत जूनमध्ये परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना मूल्यमापनाद्वारे गुण देत, पुढील वर्षासाठी प्रवेश मिळणार आहे.
भुसे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधत हा आराखडा जाहीर केला. यात, प्रामुख्याने दोन वर्षे कालावधीच्या कृषी पदविका, कृषी तंत्रनिकेतन (तीन वर्षे) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाउन उघडल्यानंतर जवळपास 8 ते 15 जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील स्थिती पाहून घेण्यात येईल.पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल. त्याकरिता 50 टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित देण्यात येतील आणि उर्वरित 50 टक्के गुण मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर आधारित असतील. प्रामुख्याने सर्व अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील.
राज्यातील बहुतेक कृषी महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहीत केली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, त्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासह कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वास्थ्य आणि सुरक्षित अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि चारही कृषी विद्यापीठांमधील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी संचालक, शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला असल्याचेही भुसे यांनी नमूद केले.
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने 15 जूनपूर्वी घेण्यात येतील, तर निकाल 15 जुलैपूर्वी जाहीर करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतल्या जातील. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धत लॉकडाउन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप होईल.
शोधनिबंध सादर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी 1 ऑगस्टला होईल. पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्राची नोंदणी 1 जुलैला होणार आहे, तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे भुसे यांनी कळविले आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास वरील नियोजनामध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतात, असेही ते म्हणाले

Previous post “त्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा”
Next post पुढील आदेशापर्यंत ग्रामसभांना स्थगिती ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News