विधानपरिषद नाराजी नाटय : १०५ चे ५० व्हायला उशीर लागणार नाही ;

समीकरणात पंकजा मुंडे,बावनकुळे हे बसत नव्हते का?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह

एकीकडं विधान परिषद निवडणुकीचं वार वाहू लागलं असताना भाजपातील इच्छुकांचा असंतोष आता बाहेर पडू लागला आहे. भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर नव्यानं सामाजिक समीकरणाची मांडणी करण्याचं काम केलं आहे, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. भाजपाच्या या स्पष्टीकरणाचा समाचार घेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर इशारा दिला आहे.
भाजपानं विधान परिषद निवडणुकीसाठी उमेवारांची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांची नाराज दडून राहिली नाही. उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर मंगळवारी एका मुलाखतीत खडसे यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले.भाजपा सामाजिक समीकरणाच्या मांडणीविषयी बोलताना खडसे म्हणाले, “नव्यानं मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. हा पक्ष ज्यावेळी पाहत होतो, त्यावेळी आणिबाणीचा कालखंड होता. जनता पार्टीचा कालखंड होता. त्यानंतर स्वतः मी कार्यरत होतो. तेव्हा या पक्षाची ओळख जी होती, ती मारवाडी, ब्राह्मण अशा पक्षाची ओळख होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, मी असेल, भाऊसाहेब फुंडकर असतील, या सर्वांनी मिळून या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. तोपर्यंत बहुजनांचा चेहरा नव्हता. इथे कुणी यायला तयार नव्हतं. ओबीसींच्या संघटना तयार झाल्या. ओबीसींचे नेते तयार झाले. वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाला बळ दिलं. चेहरा बदलवला. तो चेहरा बदलवणं आता आम्हाला सांगता आहात का?,” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

मार्चमध्येच नावांची शिफारस केल्याचं का सांगितलं?

“विधान परिषद निवडणुकीसाठी नावांची शिफारस केल्याचं मार्चमध्येच का सांगण्यात आलं. मार्चमध्ये आम्हाला सांगितलं नसतं की तुमच्या नावांची शिफारस नाही. ही सगळी फसवणूक आहे. पक्ष वाढला पाहिजे, हे आता सांगतात. आम्ही जिवाचं रान करून हा पक्ष आज जो झालेला आहे, तो आमच्या ताकदीनं, मेहनतीनं आणि आमचा खारीचा वाटा होता म्हणून झालेला आहे. यांचं काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले? आम्ही सायकलवर फिरलो. हमालासारखं फिरलो. कित्येक वर्ष तुरूंगात काढली. त्या हालअपेष्टांना पक्षामध्ये काही किंमत आहे की नाही? यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे, तेवढा नवीन माणसांचा जनाधार आहे का? वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी भाजपा राज्यातील नेत्यांवर केला.

Previous post ..अखेर विधान परिषद निवडणूक बिनविरोध,
Next post “त्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News