‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे खवळले आहेत. ‘मोदी गो बॅक’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते, असा शब्दात एकनाथ खडसेंनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारली.
एकनाथ खडसे यांनी विधानसभेला तिकीट नाकारल्याबद्दल मनातील खदखद डिसेंबर महिन्यात गोपीनाथगडावरुन जाहीर बोलून दाखवली होती.
‘तिघांची नावे शिफारस करुन पाठवण्यात आली होती. तिघांची नावे डावलून नवीन लोकांना संधी देण्यात आली’, अशी खदखद खडसेंनी बोलून दाखवली.

मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर
‘गोपीचंद पडळकर यांनी काही दिवस आधी मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण आम्ही चाळीस वर्षे निष्ठेने काम केले. भारतीय जनता पार्टी कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?
लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दोघांना भाजपने विधानपरिषदेला संधी देण्याचं ठरवलं आहे. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपचे उत्सुक चेहरे कोण होते?
पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसे म्हणाले होते.
विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Previous post भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले यांची जाहीर नाराजी
Next post दिवसभर फोन घेतले नाही,कुणाकुणाला उत्तर देऊ ; उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News