शाळा महाविद्यालया संदर्भात ३१ जुलै नंतर टप्याटप्याने निर्णय

चंद्रपूर दि १४ जुलै : जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत एक जुलै नंतर राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्याटप्याने अधिकृत निर्णय घेता येईल. मात्र तोपर्यंत विविध माध्यमांच्याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सूचना, सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जिल्हाभरात होत असलेल्या विविध प्रयोगांना पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, महानगरपालिका,नगरपालिका प्रशासन यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा संदर्भात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी पुढील काळामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, याकरिता सरपंचाची संपर्क साधला आहे. तर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांना पाठवून त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. नगरपालिका,नगरपंचायती स्तरावरदेखील ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. आम्ही सर्व एका नव्या परिस्थितीला तोंड देत असताना शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहोत. याचा उद्देश एकमेव विद्यार्थ्यांचा विकास असून त्यासाठी सर्वांनी हेतू समजून याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काल ब्रह्मपुरी येथे मार्गदर्शन करताना त्यांनी शैक्षणिक सुविधा संदर्भात मार्गदर्शन केले. सध्या शाळा, महाविद्यालय सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण असले तरी प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे राज्य शासनामार्फत भविष्यात एकत्रित सर्वांसाठी सारखा निर्णय घेणे कदाचित कठीण होईल. विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, माध्यमिक व प्राथमिक स्तरावरील शाळा,हे सध्या ऐरणीचे मुद्दे आहेत. यासंदर्भात राज्य राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय एक जुलैनंतर अपेक्षित आहे. तथापि सध्या 31 जुलै पर्यंत शाळा बंद राहील. मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामासाठी शाळेत उपस्थित राहावे, चंद्रपूर जिल्हा कार्य क्षेत्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे ठरले आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती यांनी या संदर्भात एकत्रित येऊन निर्णय घ्यावा.
महाविद्यालय संदर्भातही अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कॉलेज कधी सुरू होणार अशी विचारणा केली आहे. मात्र कोरोनाचे संकट हे शैक्षणिक मोहीम राबविण्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे. जिल्ह्यातील काही शहरांमध्ये सध्या बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे मोठ्या संख्येने प्रतिबंधित क्षेत्र, हॉटस्पॉट क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेताना प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा समजून आरोग्याच्या सर्व निकषांना लक्षात घेता शाळा-कॉलेज बाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिकेने सुरू केलेल्या मोहिमे प्रमाणे विद्यार्थ्यांनी ऐवजी शिक्षक त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम अनेक ठिकाणी राबविता येईल. जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांजवळ, कुटुंबाजवळ स्मार्टफोन नाही याचा अंदाज घेतल्या जात आहे.त्यांना पर्यायी कोणती व्यवस्था उपलब्ध करता येईल. याबाबतही आम्ही विचार करीत आहोत. त्यामुळे टीव्ही, रेडिओ, स्मार्टफोन आदी संपर्क साधनांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांसाठी एकत्रित धोरण ठरविले जाईल. त्यामुळे या काळात जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या वेळोवेळी ज्या सूचना आहेत. त्याकडे देखील पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमांचा शैक्षणिक सत्रामध्ये वापर करण्याचा निर्धार जवळपास पक्का असल्यामुळे या संदर्भात शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी ही सुरुवात करण्याचे निर्देश आपण दिले आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी आपली चर्चा सुरू असून लवकरच याबाबत देखील निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Previous post वायगाव येथे नवीन रास्त भाव दुकान सुरू
Next post वेबपोर्टलवर मिळणार बाष्पके व पाईपिंगच्या आरेखनची मान्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News